महाराष्ट्र

वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांनी केली भूमिका स्पष्ट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Feb :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन देखील होताना दिसत आहेत. शिवाय, अनेक नेते मंडळींकडून देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

“हे पहा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन.” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितलं. ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला होता.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. खासदार उदयनराजे भासले यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. तसेच, राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा अशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केली आहे.