महाराष्ट्र

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी ईडीची छापेमारी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Feb :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांना अटक केल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर छापेमारी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे.

इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी करत आहेत. सध्या त्यांच्या घरात असणारी कागदपत्रे तपासली जात आहेत. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे याची माहिती अद्यापत मिळू शकलेली नाही. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. तर यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.

शिवसेना नेत्याची चौकशी सुरु असल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे नेते धरणे आंदोलन करत होते. त्या आंदोलनात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचाही समावेश होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.