बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Feb :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा 4 मार्च रोजी सुरू होणार असून 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी तर 7 मार्चला होणारा पेपर 7 एप्रिल रोजी होणार आहे. पुणे-नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयाच्या असल्याने बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे.
5 मार्चला सकाळी 10:30 ते 2 यावेळेत हिंदी तर दुपारच्या 3 ते 6 वेळेत जर्मन जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर 7 मार्चला सकाळच्या 10:30 ते 2 या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलगु, पंजाबी, बंगाली आणि दुपारच्या 3 ते 6 या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता़ आता 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी तर 7 मार्चला होणारा पेपर 7 एप्रिल रोजी नियोजित सत्रातील वेळेत होणार आहे.