बीड

बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Feb :- परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हत्येची ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे (68) आणि शुभ्रा ग्यानबा मुंडे (70) अशी हत्या करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत. परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा मुंडे यांचे शेत आहे. याच शेतात दोघा बहिण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली.

घटनेची माहिती कळताच परळी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान हत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिस सखोल तपास करीत आहेत. मयत सटवा मुंडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. तर शुभ्रा मुंडे यांचे पतीची जमत नसल्याने त्या कायम आपल्या भावाकडेच राहत होत्या.

दोघेही बहिण-भाऊ शेती व्यवसाय सांभाळत होते. दिवसभर दोघेही शेतात काम करायचे. दुपारी जेवणासाठी आणि रात्री झोपण्यासाठी केवळ घरी यायचे. गुरुवारी सकाळीही नेहमीप्रमाणे दोघे शेतात काम करण्यासाठी घरुन निघून गेले. मात्र दुपारी जेवणाची वेळ झाली तरी दोघे घरी जेवायला आले नाहीत. त्यामुळे जेवायला का आले नाही बघायला सटवा यांचा मुलगा शेतात गेला. यावेळी सटवा आणि त्यांची बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. यानंतर परळी ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. धार्मिक वारसा असलेल्या जिरेवाडीत गुरुवारी बहिण-भावांची हत्या झाल्याने गाव हादरले आहे.