नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 Feb :- जे-जे भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील ईडीचा धाक दाखवून कारवाई केली जाते. नवाब मलिकांवर कारवाई केली जाईल याची कल्पनाही नव्हती. नवाब मलिक हे विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
आज सकाळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी 7.30 वाजेदरम्यान मलिक ईडी कार्यालयात हजर झाल्याची माहिती मिळत आहे. ईडीने समन्स बजावल्यामुळे मलिक चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जमीन खरेदी प्रकरणात ईडीने मलिक यांना समन्स बजावले असून, त्या चौकशीसाठी त्यांना आज बोलण्यात आले आहे. आज सकाळी 6.30 वाजता ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी आले होते. त्यानंतर मलिक 7.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले आहे.
ईडीने मलिकांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कधीना-कधी हे होणारच होते. हे काही नवीन नाही. मलिकांवर कारवाई होईल याची कल्पनाही मला नव्हती. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून, विरोधात बोलत असल्याने त्यांचा आवाज बंद करण्यासाठी मुद्दामुन ही कारवाई करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.
नवाब मलिक यांची गेल्या तीन तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, नवाब मलिक हे एक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारे ईडीने नोटीस पाठवली नाही. देशामध्ये जे-जे विरोधक आहेत, त्यांना ईडीकडून त्रास देण्याचे सत्र सुरू आहे. नवाब मलिक सत्य बोलत आलेले आहेत, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर मलिकांनी वारंवार ईडीच्या चौकशीवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी ईडीचे मुंबईतील माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून मलिक यांच्यामागे ईडी लागली आहे. त्याचा गुन्हा फक्त एवढाच आहे की, त्यांनी समीर वानखेडेंचा भांडाफोड केला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली आहे.