पंकजाताईंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ ; घरात राहूनच लोकनेत्यास केले अभिवादन
पंकजाताई मुंडे यांचे परिवारासह मुंबईतील निवासस्थानी पूजन तर खा. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन घेतले समाधीचे दर्शन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा गोपीनाथ गडावर तगडा बंदोबस्त
परळी – पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत लाखो मुंडे प्रेमींनी घरात राहूनच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना सहाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी परिवारासह मुंबईतील निवासस्थानी तर खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी गोपीनाथ गडावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया सकाळी ११.३० वा गोपीनाथ गडावर पोहोचल्या. मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी समाधीचे दर्शन घेतले तसेच त्यांना आवडणा-या पदार्थाचा नैवेद्य दाखवला. यावेळी आ. सुरेश धस, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, केशवराव आंधळे, आर टी देशमुख, रमेश आडसकर उपस्थित होते. समाधी दर्शनानंतर खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंकजाताई मुंडे यांचे अभिवादन
पंकजाताई मुंडे यांनी आई प्रज्ञाताई मुंडे, ॲड. यशःश्री मुंडे, डाॅ. अमित पालवे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे आदी परिवारातील सदस्यांसह मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या आवडीचा पदार्थ करून दर्शन घेतले. अभिवादनाचे दोन्ही कार्यक्रम पंकजाताई मुंडे यांच्या फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आल्यामुळे लाखो लोकांनी घरात राहूनच लोकनेत्याच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे पंकजाताई मुंडे यांनी आपला परळीचा दौरा रद्द केला होता. कार्यकर्त्यांना घरात राहूनच पुण्यतिथी साजरी करावी, गडावर गर्दी करू नये असे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि गडावर न येता घरात राहूनच लोकनेत्यास अभिवादन केले. तरीही पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गडावर तगडा बंदोबस्त तैनात केला होता.