बीड

मुंबई सोडून जाऊ नका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Feb :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील पत्राचाळ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना आपलं हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, असं आवाहन केलं आहे. या घरांसाठी अनेकांनी आंदोलन केलं. यातील काही जण तर आता आजचा क्षण बघायला हयात देखील नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. या स्वप्नाला आज सुरुवात होतेय, आज भूमिपूजन होतंय. लवकरच आपल्याला घरं देखील मिळतील. मात्र, अशी हक्काची घरं महापालिका किंवा सरकारच्या वतीने देत असतो तेव्हा माझी नेहमी एक अट असते की घर मिळवायला तुम्ही जो संघर्ष केलाय तो लक्षात ठेवा. हा संघर्ष कदापि विसरू नका.”

“अनेकजण या क्षणाची वाट बघत बघत आपल्यातून निघून गेले. त्यांची आठवण ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही आपल्या हक्काच्या या नव्या घरात पाऊल ठेवाल तेव्हा कृपया हे घर सोडून मुंबई सोडून जाऊ नका. नाही तर हा संघर्ष वायाला जाईल. ही सर्व मेहनत वाया जाईल आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्यामुळे जसा जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केला आणि हा संघर्ष जिंकला. त्यामुळे आपलं हक्काचं घर सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “गेली अनेकवर्षे पत्राचाळीचं दळण दळलं जातंय, पण प्रश्न सुटत नव्हता. अनेकांनी यासाठी आंदोलन केलं, काही जण तर आता आजचा क्षण बघायला हयात देखील नाहीत. त्या सर्वांना विनम्र अभिवादन. गेल्यावर्षी संघर्ष समिती मला भेटायला आले. तेव्हा सुभाष देसाई, जितेंद्र आव्हाड होते. तेव्हा मी त्यांना हा विषय सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर आज तो मुहुर्त साधला जात आहे.”