सिनेमा,मनोरंजन

संगीत विश्वातील ‘गोल्डीमॅन’ काळाच्या पडद्याआड

16 Feb :- अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करून देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते.

दरम्यान, बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे. 2020 मध्ये एप्रिल महिन्यात बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना सौम्य लक्षणे होती. ब्रिच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती.