बीड

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Feb :- भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावले आहे. शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहतील.

21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोगाचे कामकाज पुण्याऐवजी मुंबईमध्ये होणार आहे. कोरेगांव भीमा येथे घडलेल्या हिंसाचारासंदर्भात, 1 जानेवारी 2018 मध्ये काही विधाने शरद पवारांनी केली होती, त्यावरुन त्यांच्याकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असतील असे आयोगाला वाटते. यापूर्वीही आयोगाने शरद पवारांना 4 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावण्यात आले आहेत.

शरद पवारांनी भीमा-कोरेगांव हिंसाचारासंदर्भात काही विधाने केली होती. ते म्हणाले होते की, यामागे मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडेंचा हात असण्याची शक्यता आहे. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी त्या ठिकाणचे वातावरण खराब झाले. ते विधान माध्यमांमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे या प्रकरणी त्यांची साक्ष उपलब्ध होणं महत्त्वपूर्ण असल्याचा अर्ज विवेक विचारमंचचे सदस्य सागर शिंदेंनी केला होता. यामुळेच शरद पवारांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.