निसर्ग वादळाचे काउंटडाउन सुरू; मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर
मुंबईः निसर्ग चक्रीवादळाच्या काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. या वादळाचा परिणाम मुंबई, ठाण्यासह कल्याण आणि बदलापूरमध्ये दिसून येत आहे. मुंबई, ठाण्यासह कल्याण ते बदलापूर परिसरामध्ये पाऊस सुरू झाला आहे. यात ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरातही पाऊस पडतोय. संध्याकाळपासून या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे.
येत्या १२ तासांमध्ये निसर्ग वादळ अधिक तीव्र रुप धारण करेल, असा इशारा देण्यात आला आहे. रायगडमधील अलिबागच्या दिशेने हे वादळ पुढे सरकत आहे. वादळात वाऱ्यांचा वेग हा ताशी १०० ते १२० किमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सिधुदुर्गात जोरदार पाऊस
निसर्ग वादळाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे वातावरण एकदम बदलून गेले. सकाळपासून हवेत गारवा आला आहे. सर्वत्र जोरदार पाऊस जोरदार बरसत आहे आणि जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत. मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवगड मधील ४० लोकांना स्थलांतरित तर मालवणमधील तीन लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ८२ निवरा संकुले सोय तयार आहेत. उद्या बुधवारी जिल्ह्यात प्रवास बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी काढला आहे. कोरोना चा होणारा वाढता फैलाव आणि त्यात निसर्ग वादळ यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे
विमानसेवा रद्द होण्याची शक्यता
वादळादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून काही विमान कंपन्यांनी केवळ मुंबईत पार्क असलेली विमानेच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी २५ ऐवजी काही विमानांचीच उड्डाणं येथून होऊ शकतील. तर काही उड्डाणे रद्द होऊ शकतात. याखेरीज विमानतळारील लहान खासगी विमानांनी अन्य विमानतळांवर जाऊन तेथे विमाने उभी करावी, अशी सूचना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडून (मिआल) देण्यात आली आहे. जी विमाने बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांनी विमाने हँगरमध्ये उभी करावी, अशी सूचना मिआलकडून संबंधितांना देण्यात आली आहे. याबाबत सायंकाळी उशीरा विमानतळावर महत्त्वाची बैठक झाली.