भारत

गाणकोकीळा शांत!

6 Feb :- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.

भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं.

लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते.