महावितरणचा गलथान कारभार शेतकऱ्याच्या मुळावर; 19 एकर ऊस जळाला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 Feb :- बीड जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहक तारेच्या शॉर्टसर्किटने, शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येत आहेत. काल पुन्हा एकदा तीन शेतकऱ्यांचा, विद्युत वाहक तारेच्या शॉर्टसर्किटने, जवळपास 19 एकर ऊस जळालाय.
दत्ता गोडबोले, भाऊसाहेब गोडबोले, लक्ष्मण गोडबोले असं नुकसानग्रस्त ऊस शेतकऱ्यांचं नाव आहे. तर ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही महावितरणकडे लोंबकळणाऱ्या तारा विषयी तक्रार केली. मात्र त्यांनी तारा दुरुस्ती केल्या नाहीत, आणि त्यामुळेच आता माझा 13 एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यामुळे महावितरणने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भाऊसाहेब गोडबोले यांनी केली आहे.
या विषयी भाजपचे नेते शाम कुंड म्हणाले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. त्यात अतिवृष्टीनं पिकांसह जमीनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यात कुठंतरी हा शेतकरी आता उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
दिवसेंदिवस महावितरणचा गलथान कारभारामुळे ऊस जळाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तात्काळ महावितरणने लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त कराव्यात. अन्यथा येणाऱ्या दिवसात आमदार लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन करत रस्त्यावर उतरू. असा इशारा भाजप नेते शाम कुंड यांनी दिला आहे.