दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा वाढीव वेळ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 Jan :- ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयीअभावी दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नयेत म्हणून त्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ मिळावा. तसेच वर्तमान परिस्थितीसह विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागासोबत झालेल्या आभासी बैठकीदरम्यान शुक्रवारी केली.
या परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करावा, असेही ते या वेळी म्हणाले.
दहावी तसेच बारावी या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. २ वर्षांपासून कोविडमुळे शिक्षण व परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत आणि प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी यामध्ये फरक आहे. इंटरनेटअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बऱ्याचदा ऑनलाइन शिकवणीपासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षा पद्धतीचे नियोजन व्हावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी केले.