मराठवाडा

आईची काळजी घ्या म्हणून गेलेला बाप परतलाच नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Jan :- “मुलांनो तुमच्या आईची काळजी घ्या” मी कर्ज घेतलेले पैसे परत करूनच परत येतो असे म्हणून घरातून निघून गेलेला बाप परत आलाच नाही. कर्जाचे पैसे फेडण्यासाठी विहिरीवर खोदकाम करणाऱ्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयस्पर्शी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे घडली आहे.

घरातल्या कर्त्या व्यक्तीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे विहीर खोदण्याचे काम करून व्याजाचे पैसे देण्यासाठी या शेतकऱ्याची धडपड सुरु होती. परंतु, काळाने घाला घातला..! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडितराव सिताराम कळम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी आहेत.

शेती कमी असून शेतीवर परिवाराचा उदरनिर्वाह होत नाही. म्हणून ते मोलमजुरी करत असत. मजुरीच्या पैशांवर त्यांचे कुटुंब चालत होते. 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न झाले त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला. मागील वर्षभरापासून ते विविध ठिकाणी विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. विहिरीचे खोदकाम करताना त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले.

डोक्यावर मार लागल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्यांच्या मेंदुवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.

रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वडोद तांगडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. कर्जाचे पैसे चुकवण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.