महाराष्ट्र

मराठवाडा, विदर्भही गारठला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Jan :- मराठवाडा, विदर्भात अद्याप थंडीचा कडाका जाणवत असून गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्याचे तापमान ८.८ नोंदवले गेले. तर खान्देशात धुळे जिल्ह्यात सर्वात कमी २.८ अंश सेल्सियसची नोंद झाली. विदर्भासह खान्देशात दोन दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तरेकडील थंडगार वाऱ्यांमुळे राज्यात सर्वत्र किमान तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात किमान तापमान हे ५ अंशांपेक्षाही खाली गेल्याने निफाड तालुक्यात दवबिंदू गोठले होते. गुरुवारी मात्र मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. गुरुवारपासून किमान तापमानात काही अंशी वाढ झाली असल्याने कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. परंतु गार वारे वाहत असल्याने वातावरणात दिवसभर गारवा जाणवत होता.

विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती हे जिल्हे गारठले होते, तर मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत किमान तापमानात घसरण झाली होती. जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक, महाबळेश्वर या शहरांमध्येही थंडीचा कडाका जाणवला. जळगाव, खान्देशात पारा कमालीचा घसरल्यामुळे थंडी कडाका प्रचंड वाढला आहे.

गुरुवारी धुळ्याचा पारा नीचांकी २.८ अंशांवर घसरला. मागील दोन वर्षांत २७ जानेवारी २०२२ हा सर्वात थंड दिवस अशी नोंद झाली आहे. यापूर्वी २९ जानेवारी २०१९ मध्ये २.७ एवढे नीचांकी तापमान होते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमानात दररोज घट होत आहे. नंदुरबारचे ८.० अंश तर तोरणमाळचे ५ अंश तापमान नोंदले गेले. खान्देश, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी २९ जानेवारीपर्यंत थंडीची लाट राहणार आहे. धुक्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत थंडी कमी होणार आहे. -माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ