बीड

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर थेट निशाणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

लक्ष्मी हरवली म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस- भाजप नेत्या पंकजा मुंडे

25 Jan :- आपल्या जिल्ह्यातली लक्ष्मी हरवलीय, त्यामुळे हे वाईट दिवस आले आहेत. मी पालकमंत्री असते तर जिल्ह्याचा विकास केला असता. त्यात कोणताही भेदभाव केला नसता, असा थेट निशाणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साधला. बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायत इमारतीचा आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमप्रसंगी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले. पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले.

माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते.

मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते. मी विकास करताना कोणते गाव कुठल्या पक्षाचे आहे, हे पाहिले नाही. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी भेदभाव केला. बीड जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समसितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.