महाराष्ट्र

भीषण अपघातात आमदार पुत्रासह सात भावी डॉक्टरांचा मृत्यु

25 Jan:- वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदार पुत्रही यात मरण पावलाय.

पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली. त्याने वर्धेकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिलीय.

उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले की सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले. यात तिरोडा येथील आमदारांचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी मदत करणाऱ्यांमध्ये होती. सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.