महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Jan :- राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरून मंथन सुरू आहे. अशातच सोमवारी (२४ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक घेत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे यावरही या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणाबाबतची बैठक ठेवली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक डेटा, राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाचं कामकाज आणि पुढील बैठकीत सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करायचा अशा अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय दिलाय. मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय आता राज्याने नेमलेले राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा त्यांनी आयोगाला द्यावा त्यानंतर आयोग दोन आठवड्यात त्या डेटावर आरक्षण तात्पुरते देता येईल की नाही हे कळवणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही हे आयोगाच्या निर्णयावर आणि दोन आठवड्यात ठरणार आहे. ही तात्पुरती सोय केवळ आत्ताच्या निवडणुकांपुरती असणार आहे.