महाराष्ट्र

सहा दशकांचा सुरू हरपला

22 Jan :- संगीत रंगभूमीवरील सहा दशकांची कारकीर्द गाजविलेल्या प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून डायलेसीसचे उपचार सुरु होते.

संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. अशाप्रकारे त्यांनी वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला.

गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा साठहून अधिक वर्षे अविरतपणे केली. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार होत्या.