बीडमध्ये चंदनांची तस्करी करणाऱ्या १७ जणांना अटक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 Jan :- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री परिसरात शुक्रवारी पहाटे १७ चंदन तस्करांची टोळी गजाआड केली. यावेळी पोलिसांनी तस्करांकडून ३२८ किलो चंदनाच्या लाकडासह चार दुचाकी आणि अवजारे असा एकूण नऊ लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व त्यांच्या सहकार्यांनी एका गोदामावर छापा टाकून चंदन तस्कर टोळीच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी ३२८ किलो चंदनाची लाकडे एकत्रित आणून त्याची छाटणी करत त्यातून गाभा काढत असलेल्या सतरा जणांना पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून नऊ लाख आठ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात विष्णू बांगर या मुख्य आरोपीसह अन्य सोळा जणांविरुध्द चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यात चंदन तस्करांची टोळी सक्रीय होती. रातोरात चंदनाच्या झाडाची कत्तल करुन ती सर्व लाकडे एकत्रित आणून त्यातून गाभा काढण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. या प्रकरणी स्थानिक शेतकर्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने या भागातील शेतकरीही हतबल झाले होते. अखेर पोलिसांना टोळीला जेरबंद करण्यात यश आले.