बीड

विचित्र जुगाड! पेट्रोल पंपाबाहेर 10 रुपये भाड्याने मिळू लागले हेल्मेट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Jan :- बीडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. असाच एक विचित्र असणारा जुगाड समोर आला आहे ज्याचे चर्चा राज्यात सुरु झाली आहे. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी एक विचित्र जुगाड करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात आलंय. मात्र बीडमध्ये याच शासन निर्णयास धाब्यावर बसवून, सर्रास पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्त्वावर हेल्मेट दिले जात आहे.

हेल्मेट न वापरता पेट्रोल भरायला जाणाऱ्यांना पेट्रोल पंपाबाहेरच हेल्मेट दहा रुपये भाड्याने दिलं जात असल्याचा व्हिडीओ सध्या वायरल होतोय. हेल्मेट सक्तीचे आदेश बीडच्या सर्वच पेट्रोल पंपावर झळकत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे.

दुसरीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेत्यांकडून जुगाड करणाऱ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेला हा स्वस्त धंदा आरोग्याच्या महागात पडण्याची चिन्हं आहे. तेच तेच वापरलेले हेल्मेट ग्राहकांना देत असल्यानं करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या हेल्मेट सक्तीमुळे पेट्रोल पंप चालक आणि ग्राहकांमध्ये आता वाद होऊ लागले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी देखील आता सर्वसामान्य बीडकरांसह पेट्रोल पंप चालक करत आहेत.