News

निसर्ग चक्रीवादळाचा धोका वाढला; मुंबईसह किनारपट्टीवर रेड अॅलर्ट

मुंबई:मुंबई शहरावर निसर्ग चक्रीवादळाचं संकट घोंगावू लागलं आहे. या वादळाच्या तडाख्यासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दलासह पालिका यंत्रणाही सज्ज झाली आहे. दुसरीकडे पुढील १२ तासांत निसर्ग चक्रीवादळ रौद्र रूप धारण करण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली असून रेड अॅलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक होत असून या बैठकीत वादळाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

भारतीय हवामान विभागाने ताज्या स्थितीचा अंदाज घेऊन निसर्ग चक्रीवादळ अत्यंत तीव्र असेल अशी शक्यता वर्तविली आहे. पुढील १२ तासांत हे वादळ रौद्र रूप धारण करू शकते, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर धोक्याचा इशारा देण्यासाठी लाल बावटे लावले आहेत.

किनारपट्टी भागात रेड अॅलर्ट

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित झाल्यानंतर तेव्हापासूनच या संपूर्ण किनारपट्टी भागात रेड अॅलर्ड असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

NDRFची १० पथकं तैनात

निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रातील प्रत्येक बदलांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. पालघर किनारी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य व्हावे म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची दोन पथक येथे तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय मुंबईत ३, ठाण्यात १, रायगडमध्ये २, रत्नागिरीत १ आणि सिंधुदुर्गात १ अशी १० पथके तैनात करण्यात आली असून ६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.