करुणा मुंडेंना अश्रू अनावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 Jan :- सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे या काल औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार होत्या. मात्र ऐनवेळी पोलिसांनी या बैठकीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे लोकशाही प्रधान देशात एका महिलेवर सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही करून रोखले जात आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा-मुंडे यांनी केला. राजकारणात सक्रीय होण्यासाठी करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना केली आहे.
करुणा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या शिवशक्ती सेना पक्षाच्या बांधणीसाठी मी राज्यभर दौरे सुरु केले आहे. पक्षाच्या माध्यमातून महिला, शेतकरी, ऊसतोड कामगार, एसटी कामगार यांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहे. यासाठी मी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही हितशत्रू जाणूनबुजून मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बीड येथे कारमध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी अटक झाल्याचा विषय निघताच करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. जेलमधील ते दिवस कधीही विसरणार नाही, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच कौटुंबिक कलहावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट झाली नाही, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलण्याचेही त्यांनी टाळले.
राजकीय दौऱ्याच्या निमित्ताने 25 वर्षानंतर आपण घराबाहेर पडल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. तसेच माझा कुणालाही विरोधा नाही. मात्र पती सत्ताधारी पक्षात असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी ते सगळीकडून प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.