सत्ता असूनही यश मिळवण्यात कमी पडले- पंकजा मुंडें
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 Jan :- बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलं. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्चस्व मिळवत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. तर वडवणी मध्ये सत्ताधारी भाजपाला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवला.
केजमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्याठिकाणी राष्ट्रवादी, शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येला पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्ह्यात मुंडे बहीण भावात रंगलेल्या सत्तासंघर्षात बहिण पंकजा मुंडे यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.
आष्टीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या झालेल्या सभेदरम्यान संघर्ष दिसून आला होता. दरम्यान ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादीने जोर लावल्यानं आमदार सुरेश धस आपला गड राखतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ते आपलं वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरले. आष्टीत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आमदार सुरेश धस यांना विजयाचं श्रेय दिल आहे. तर येणाऱ्या पुढील निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपा सत्तेत येईल असं देखील धस यावेळी म्हणाले.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती असं म्हटलं. “सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. लोकांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. “ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हीत. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात फरक आहे. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे.
बीडमधील लोकांनी भविष्यात काय चित्र असेल हे दाखवलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. “बीड जिल्ह्यात एकसंघ असा भाजपा सोडून कोणताही पक्ष नाही. जे नेते आहेत हे एका भागापुरते आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असा विचार करणारा एकही नेता नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. सत्तास्थापनेचा जनादेश दिला आहे,जो विजय मिळाला आहे तो कार्यकर्ते यांचा विजय आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.