राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
13 Jan :- देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. राज्यातही रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. यातच महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी मंत्रिमंडळाला वरील बाबी सांगितल्या आहेत. यावर मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आहे. राज्यात वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजनच्या रोजच्या गरजेत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला राज्यात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, “ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढल्यास कडक निर्बंध घालावे लागतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला गती देऊन आवश्यक ती पावले उचलावीत.
” पुढे ते म्हणाले की, “पूर्णपणे लसीकरण झालेल्या करोना रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता नसते. परंतु लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे.
राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.