राज्यात कोरोनाचा धुमाकूळ; आज मोठ्या संख्येत झाली रुग्णवाढ
2 Jan :- राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. कारण राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 11 हजार 877 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. राज्यात आज दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2069 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या ओमायक्रोन हा नवा विषाणूदेखील महाराष्ट्रात थैमान घालताना दिसतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 नव्या ओमायक्रोनबाधितांंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा थेट 510 वर पोहोचला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 50 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 2, पिंपरी चिंचवड येथील 8 तर पुणे मनपा हद्दीतील तब्बल 36 रुग्णांचा समावेश आहे. तर सांगलीतील 2, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 510 वर पोहोचला आहे.