बीड

पंकजा मुंडेंना ओमायक्रॉन झाल्याचे कळताच धनंजय मुंडेंचा मेसेज

2 Jan :- बीडमध्ये भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्रासाठी सर्वश्रुत आहे. पण, पंकजा मुंडे यांना कोरोनाचा व्हेरिएंट ओमायक्रॉनची लागण झाल्याचे कळताच भाऊ धनंजय मुंडे यांनी ‘पोस्ट कोविडचा त्रास जास्त होतो काळजी घे’ असा मेसेज पंकजा मुंडे यांना केला आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशातच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. पंकजांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मेसेज करत काळजी घेण्याची सूचना केली आहे.

‘मी पंकजाताई ला फोन तर करू शकलो नाही मात्र मेसेजद्वारे सांगितले की, पोस्ट कोविड होण्याची दाट शक्यता असल्याचे तब्येतीची काळजी घेण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा यांना सांगितलं. तसंच, अद्याप कोरोना संपलेला नाही नागरिकांनी जरुरी असेल तरच घराच्या बाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्क व सेनिटायझरचा वापर करावा असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी बीडकरांना केले आहे.