पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काही दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान वेगवान वारा वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांसोबत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.