बीड

शिवसैनिकांना एकसंघ ठेवण्याची क्षमता असलेल्या युधाजित पंडित यांची जिल्हा प्रमुखपदी निवड करावी — दिनकर शिंदे

2 December:- गेवराई विधानसभा मतदारसंघा सोबत बीड जिल्ह्यातील ज्येष्ठांसह युवा सैनिकांना सोबत घेऊन शिवसेना मजबूत करण्याची क्षमता असलेल्या, शिवसेना जिल्हा समन्वयक तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांची बीड जिल्हाप्रमुखपदी निवड करून शिवसैनिकांना बळ द्यावे अशी मागणी गेवराई तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.


सध्या बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पद स्थगित करण्यात आलेले असून, लवकरच नवीन जिल्हा प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात शिवसेना वाढवून मजबूत करायची असेल आणि जेष्ठांसोबत युवकांनाही राजकीय तसेच सामाजिक प्रवाहात आणायचे असेल तर जिल्हा शिवसेनेला अनुभवी व खंबीर जिल्हाप्रमुखाची आज गरज आहे. माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांच्या सानिध्यात तयार झालेले चरित्र संपन्न युवा नेतृत्व युधाजित पंडीत हे या पदासाठी अत्यंत लायक नेतृत्व आहे.

अर्थ व बांधकाम आणि कृषी व पशुसंवर्धन या दोन विभागाचे दोन वेळेस जिल्हा परिषदेचे सभापती, गेवराई पंचायत समितीचे सदस्य आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिलेल्या युधाजित पंडीत यांना जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा दांडगा अभ्यास आणि अनुभव आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड केल्यास गटबाजी न होता, जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक व पदाधिकारी एकत्र येतील. त्यामुळे निश्‍चितपणे येणाऱ्या काळात शिवसेना अधिक मजबूत होऊन शिवसैनिक आपली राजकीय ताकद दाखवून देण्यास सक्षम होतील. तसेच प्रामाणिक आणि कट्टर असलेल्या शिवसैनिकांना राजकीय पाठबळ मिळवून सत्तेत वाटा मिळेल.

बीड जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघात युधाजित पंडित यांची ओळख असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला व शिवसैनिकांना सत्तेत आणण्यासाठी त्यांच्या संघटन अनुभव व कार्यपद्धतीचा निश्चितपणे फायदा होईल. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी युधाजित पंडित यांची शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी निवड करून शिवसैनिकांना बळ द्यावे अशी मागणी शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सचिव खा अनिल देसाई, मराठवाडा संपर्क नेते खा चंद्रकांत खैरे, मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर, जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.