मराठवाडा

दरोडेखोरांनी बँकेतून लुटला सव्वा कोटीचा ऐवज

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Oct :- अंबड तालुक्यातील शहागड येथे गुरुवारी बँक बंद होण्याच्या सुमारास तीन सशस्त्र दरोडेखोरांनी सिनेस्टाईल बँकेत घुसून बँकेतील कर्मचाऱ्यांच्या डोक्याला रिव्हाल्वर लावून दरोडा घातला. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एका रुममध्ये कोंडून या दरोडेखोरांनी बँकेतील कँश रूम तसेच बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्याचे पाकीट असा सव्वा कोटीच्या आसपास ऐवज लुटून पोबारा केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान दरोडा पडल्याचे कळताच या बँकेचे खातेदार व सोने तारण केलेल्या ग्राहकांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान तीन्ही सशस्त्र दरोडेखोर हे 30 ते 32 वयोगटातील असून ते मराठी भाषा बोलत होते. दररोज हि बँक सहा वाजता बंद होते, यावेळेच्या काही मिनिटांपूर्वी दरोडेखोरांनी ग्राहक बँकेत नसल्याचा फायदा घेऊन बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिव्हाल्वरचा धाक दाखवून हा दरोडा टाकला.

दरम्यान दरोडेखोरांनी कॅशियर प्रमोद कुटे यांच्या डोक्याला रिवाल्वर लावून सोने तारण व रक्कम रुमची चावी दे, नसता तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर रोख रक्कम 25 लाख व सोने जवळपास 1 कोटी असा ऐवज सोबत आणलेल्या बॅगेत टाकून बँकेच्या बाहेर उभा केलेल्या दुचाकीवर पैठण फाट्याच्या दिशेने दरोडेखोरांनी पोबारा केला.

दरोडा पडला यावेळी बुलढाणा अर्बन शाखेत बँकेचे मॅनेजर खापर, क्लार्क रंगले, बांगर, कँशियर प्रमोद कुटे, मावळे, लिपिक सय्यद, शिपाई निवास गोविंद चव्हाण होते. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यामध्ये दरोडेखोर कैद झालेले आहेत.