महाराष्ट्र

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Sept :- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला.

कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागांतून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काल (मंगळवारी) सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 26 मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

सध्या बचाव आणि तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा आणि महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.