महाराष्ट पोलिस दलाला करोनाचा विळखा; एका दिवसांत ९१ पोलिसांना लागण
मुंबईः राज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाम दिवसेगणिक वाढतच आहेत. मागील चोवीस तासात ९१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. शनिवारपर्यंत करोनाबाधित पोलिसांचा आकडा २४१६पर्यंत पोहचला आहे. तर, आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १२३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील २४ तासांत ९१ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये १६ पोलिस मुंबईतील, तीन नाशिक व दोन पुण्यातील असून प्रत्येकी एक सोलापुर, ठाणे आणि मुंबई एटिएस या ब्रँचमधील आहेत. या आठवड्यात दररोज १००हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना संसर्ग होत असल्याचं पोलिस दलातील अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई पोलिस दलात करोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मुंबईसह राज्यभरातील पोलिस आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. ही सेवा बजावताना अनेक पोलिसांना करोनाने गाठले आहे.
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाबाधितांची संख्या ६२,२२८ असून एकट्या मुंबईत ३६, ९३२ रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत २,०९ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.