मराठवाडा

मराठवाड्यात पावसाचा मुक्काम वाढला; ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

25 Sept:- सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह दाखवली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हा प्रभाव पुढील 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


25 सप्टेंबर – शनिवारी औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं दर्शवली आहे.
26 सप्टेंबर – रविवारी जालना, बीड, उस्मनाबाद आणि लातूसह औरंगाबाद जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.


27 सप्टेंबर- सोमवारी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, औरंगाबाद, जालना, बीडमधील वातावरण ढगाळ राहिल. मात्र परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


28 सप्टेंबर – येत्या मंगळवारीही मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसू शकतो, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने व्यक्त केली आहे.

2021 चा मान्सून लांबणार
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं यंदा देशात मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल असा अंदाज पूर्वी वर्तवला होता. मात्र आता 2021 चा मान्सून देशात लांबणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी दिली आहे.

राजस्थानातून यंदा पाऊस उशिरा निघणार आहे. जवळपास 7 ते 8 ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या एक्झिटला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्यानं शेतकऱ्यांपुढं खरिपाची पीकं कशी काढायची असा प्रश्न उभा राहिला आहे.