NewsPopular NewsRecent NewsTrending Newsपाऊसबीडमहाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२१ सप्टेंबर|राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्या उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाड्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्यांचा वेग अधिक राहणार आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाऱ्यांचा वेग अधिक असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे.देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे.