पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या,11 दिवसांचं बाळ पोरकं
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आधी आपल्या पत्नीची विष पाजून हत्या केली. त्यानंतर स्वत:ने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या घरात अवघ्या 11 दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला होता. आई-वडिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं झालं आहे. मृतक तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून इतक्या टोकाचं पाऊल उचललं असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव दलीप असं आहे. तर त्याच्या 22 वर्षीय पत्नीचं प्रतिभा असं नाव आहे. दलीपने जेव्हा पत्नीला विष पाजून आत्महत्ये केली तेव्हा त्यांच्या घरात फक्त 11 दिवसांचं बाळ होतं. ते बाळ खूप रडत होतं. त्यामुळे गावातील इतर लोक घरात शिरले. त्यावेळी एकच खळबळ उडाली. कारण घरात दलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर त्याची पत्नी बेडवर पडलेली होती. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
सुरुवातीला दोघं पती-पत्नीने आत्महत्या केली, असा गावकऱ्यांना अंदाज होता. पण पोलिसांनी घरात तपास केला असता दलीपची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. मृतक दलीपने त्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसला देखील सुसाईडचा फोटो टाकला होता. त्याने अशाप्रकारे टोकाचा निर्णय घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केली जातेय. दलीप हा उत्तराखंडमध्ये एका कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होता. मुलाच्या जन्मानंतर तो सुट्टी घेऊन गावी आला होता. पण या सुट्टी दरम्यान त्याने टोकाचं पाऊल उचललं.
“आयुष्याशी खूप त्रस्त झालोय. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळेच खूश होते. पण मी खूश नव्हतो. मी जिच्याशी लग्न करतोय ती माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल, असं माहिती नव्हतं. प्रतिभाने आमच्या पवित्र नात्यावर लाजिरवाणे आरोप केले. तिच्या आई-वडिलांनी देखील अशाचप्रकारचे आरोप केले आहेत. मी एक-एक दिवस कसा काढत होतो ते मित्रांनाही ठावूक नाही. प्रतिभामुळे मी खूप त्रस्त झालोय. त्यामुळेच मी आता प्रतिभाला संपवतोय. त्यानंतर मी स्वत:लाही संपवतोय”, असं दलीप सुसाईड नोटमध्ये म्हणाला.
“माझी आई मामांकडे गेलीय. मी संपूर्ण शुद्धीत प्रतिभाला संपवण्याचा निर्णय घेतलाय. माझ्या मुलाचं यश असं नाव आहे. आमच्या मृत्यूनंतर मुलगा हा आईकडे देण्यात यावा. तसेच माझी आई आणि दोन्ही बहिणी येत नाहीत तोपर्यंत माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत”, असंदेखील तो सुसाईड नोटमध्ये म्हणाला.