बीडमध्ये पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
बीड : कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. राजाभाऊ आणि शीतल जाधवर हे दोघेही पती पत्नी पुणे येथे पेशाने शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या शिक्षिका पत्नीने आपल्या मुलीसह माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पतीच्या निधनानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. 24 वर्षीय पतीचा आजारपणात मृत्यू झाल्यानंतर 22 वर्षीय पत्नीनेही आपलं आयुष्य संपवलं होतं. विरार पूर्वमधील मनवेलपाडा गावातील दादूस क्लासिक अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील 302 क्रमांकाच्या रुममध्ये ही घटना घडली होती. नरेंद्रसिंग परमार (वय 24 वर्ष) असं पतीचं नाव आहे, तर संतोषकुवर नरेंद्र सिंग परमार (वय 22 वर्ष) असे पत्नीचे नाव होतं.
मयत दाम्पत्य मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी होते. कामानिमित्त ते विरारमध्ये राहण्यासाठी आले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. पती आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात एकट्याच असणाऱ्या पत्नीनेही हॉलमध्येच फॅनला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी त्यांचे नातेवाईक घरी गेल्यानंतर ही घटना उघड झाली होती.
दरम्यान, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वसईच्या मर्सेस गावात स्मिता डिसिल्वा (वय 35) या विवाहित महिलेने आत्महत्या केली होती.
दुसरीकडे, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.