वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीने केली फसवणूक
शेतकऱ्यांना कापसाचा विमा नुकसानीप्रमाणे देण्याची भाजपची मागणी वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना आला हेक्टरी ४१०० रूपये विमा
वडवणी (प्रतिनिधी) गेल्या वर्षीच्या कापुस पिकासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा भरला होता. परंतु कापुस पिकाचे शंभर टक्के नुकसान झालेले असताना व कापूस पिक हे पुर्णतः गेलेले आहे. त्यामुळे योग्य पिक विमा मिळण्याच्या आशा शेतकऱ्यांना होती. परंतु मागच्या दोन दिवसांपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होत आहे यामध्ये असे दिसून येत आहे की शेतकऱ्यांनी हेक्टरी २१५० रुपये बँकेत पिक विमा भरणा केला असताना फक्त हेक्टरी ४१०० रुपये विमा मंजूर केला आहे. तरी विमा कंपनीने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केली असून शेतकऱ्यांना कापुस पिकाच्या नुकसानीप्रमाणे विमा द्यावा नसता पिक विमा कंपनी विरोधात भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांसह तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे भाजपा वडवणी तालुका उपाध्यक्ष महादेव सावंत व इतरांनी दिला आहे. वडवणी तालुक्यात गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर कापुस पिकाची लागवड केली होती. यामध्ये अवकाळी अतिवृष्टीमुळे व बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे कापुस पिक उध्वस्त होऊन पिक हातचे जाऊन शंभर टक्के नुकसान झालेले होते. यामध्ये शेतकऱ्यांना एक्करी फक्त एक क्विंटल कापूस उत्पादन झालेले असुन त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला शेती खर्चही निघालेला नाही. तरी शेतकरी अशा आपत्ती, संकट येतात म्हणून पिकाला शासनमान्य कंपनीकडे पिकाचा संरक्षण विमा उतरवतात व भरतात. यामध्ये तालुक्यातील वडवणी व कवडगाव मंडळातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कापसाला प्रति हेक्टरी नियमाप्रमाणे २१५० रूपये विमा भरलेला आहे. परंतु विमा कंपनीने नुकतेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति हेक्टरी ४१११ रुपये विमा जमा केला आहे. तरी यामध्ये कापूस पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनही अत्यंत कमी पिक विमा देऊन शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा करून फसवणूक करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येत आहे. यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पिक विमा कंपनीच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच मागच्या वर्षी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३१००० रूपये कापूस पिक विमा मंजूर झाला होता त्यापेक्षा यावर्षी जास्त नुकसान कापुस पिकाचे झाले आहे तरी पिक विमा कंपनीने विमा नुकसानीप्रमाणे दिलेला नाही. नुकसानीप्रमाणे विमा देण्यात यावा नसता लोकशाही मार्गाने विमा कंपनी विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी व इशारा दि.३० मे २०२० रोजी तहसीलदार, वडवणी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे महादेव गणपतराव सावंत भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष वडवणी, गणेश जाधव युवा नेते, धनंजय रामराव जोगदंड, सुनिल लहानु सावंत, राजेंद्र मुरलीधर जोगदंड, हिताराम भगवान सावंत यांनी केली आहे.
चौकट…
मी वडवणी तालुक्यातील साळींबा येथील शेतकरी असुन मी शासनमान्य कंपनीकडे गेल्या वर्षी कापूस पिकाचा माझा व पत्नीच्या नावे प्रति हेक्टर २१५० रूपये पिक विमा भरलेला होता. तरी आता आम्हाला प्रति हेक्टरी ४१११ रूपये मंजूर पिक विम्याचे पैसे बँक खात्यात जमा झालेले आहेत. आमच्या कापूस पिकाच्या नुकसानीप्रमाणे विमा कंपनीने दिलेला नाही. त्वरीत नुकसानीप्रमाणे पिक विमा द्यावा नसता शेतकरी पिक विमा कंपनी विरोधात आंदोलन करतील. :- गणेश जाधव (शेतकरी साळींबा)