100 हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारलं
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कर्नाटकातील शिवमोगामध्ये 100 हून अधिक भटक्या कुत्र्यांना विष दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती परिसराजवळ असलेल्या एका गावात 100 पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारलं आणि त्यानंतर त्यांना पुरण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती शहराजवळील कंबाडललू-होसूर ग्रामपंचायत अंतर्गत रंगनाथपुरा गावात भटक्या कुत्र्यांना मारण्यात आलं. काही स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्यांना पुरताना ते जिवंत होते आणि त्यांचा जोरात भुंकण्याचा आवाजही ऐकू येत होता.
पण जेव्हा अचानक कुत्र्यांचं भुंकणं थांबलं तेव्हा लोकांना संशय आला. स्थानिक लोकांनी शिवमोगा अॅनिमल रेस्क्यू क्लबला हि माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पशुवैद्यक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने भटक्या जनावरांचे मृतदेह मंगळवारी बाहेर काढण्यात आले.
या प्रकरणाबाबत भद्रावती पोलिसात ग्रामपंचायत सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेत स्थानिक पंचायत सदस्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक म्हणजे कुत्र्यांना जीवंत जाळण्यात आल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पशुवैद्यकीय टीम या प्रकरणाचा तपास करत आहे आणि लवकरच त्याचा अहवाल पोलीस विभागाला सादर करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी घाढलेल्या कुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा ते अतिशय वाईट स्थितीत होते. सर्व मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. असंही म्हटलं जात आहे की कुत्र्यांना जिवंत जाळून पुरण्यात आलं. मारण्यात आलेल्या कुत्र्यांची नेमकी संख्या पोलिसांनी सांगितलेली नाही.
पण ही संख्या 100 पेक्षा जास्त असू शकते. शिवमोगा अॅनिमल रेस्क्यू क्लबचे सदस्य जीएस बसव प्रसाद यांच्या मते, पुरलेल्या कुत्र्यांची संख्या 300 च्या जवळपास असू शकते.