लहान मुलांसाठी लस आवश्यक आहे की नाही?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
भारतात 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेनं बऱ्यापैकी वेग धरला आहे. मात्र, लहान मुलांना लस कधी दिली जाणार किंवा लहान मुलांना लस आवश्यक आहे की नाही, असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.भारतातील विविध राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचे दिशानिर्देश देत शाळा उघडण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा उघडण्याची मागणी एका बाजूने वारंवार केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवा, इतकी घाई कसली, असा प्रश्न विचारणारेही लोक आहेत.देशभरातील शिक्षण संस्था, वैद्यकीय क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असल्याचं दिसून येतं.दरम्यान,लहान मुलांना लस देण्यात यावी किंवा नाही, या चर्चेनेही आता जोर पकडल्याचं दिसतं.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या प्रकरणावरून जोरदार चर्चा आहे.ब्रिटनचा विचार केल्यास लसीकरण सल्लागार समितीने 12 ते 15 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यासंदर्भात असहमती दर्शवली आहे.लहान मुलांना कोरोना विषाणूचा धोका मुळातच कमी असल्यामुळे त्यांना लसीकरणाचा तितका उपयोग होणार नाही, असं तेथील लसीकरण आणि रोगप्रतिकारशक्ती संयुक्त समितीने (JCVI) सांगितलं.हृदय, फुफ्फुस किंवा यकृताशी संबंधित गंभीर आजार असलेल्या मुलांनाच केवळ लस देण्यात यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.अशा व्याधी असलेल्या मुलांनाच कोरोनाचा धोका जास्त आहे, त्यामुळे त्यांनाच फक्त लस दिली जावी, असं तज्ज्ञांना वाटतं.दुसरीकडे भारतात लहान मुलांना लस देण्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय क्षेत्रात मत-मतांतरं असल्याचं दिसून येतं.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन इन इंडियाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांच्याशी याविषयी बातचीत केली.देशात 12 ते 17 वयोगटातील मुलांना ऑक्टोबर महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून झायडस कॅडिलाची (Zyco-D) लस दिली जाईल. ही लस किशोरवयीन मुलांकरिता सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.पण त्यातही सहव्याधी असलेल्या लहान मुलांनाच प्राधान्याने लस देण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.ते सांगतात, “आम्ही को-मॉर्बिडिटीज असलेल्या मुलांनाच लस देण्यापासून सुरुवात करू. अशा मुलांना कोरोनाची लागण झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. या मुलांना मृत्यूचा धोका जास्त असतो. प्रौढांचं लसीकरण डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर आम्ही सुदृढ बालकांनाही लस देणं सुरू करणार आहोत.”झायडस कॅडिलाच्या लशीला भारतात परवानगी मिळाली आहे.
ही सुईविरहीत लस आहे. यामध्ये जास्त वेदनाही नसतील, असं डॉ. अरोडा म्हणाले.तोपर्यंत 2-18 वयातील बालकांसंदर्भात लशीच्या चाचणीचे परिणामही येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्याचप्रमाणे इतर कंपन्याही लशीच्या चाचण्या घेत आहेत. त्याचीही आकडेवारी येईल. त्यानंतर 18 पेक्षा कमी वयाच्या सुमारे 44 कोटी मुलांचं लसीकरण पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत सुरू केलं जाऊ शकतं.कोरोना लस सरसकट सर्वच मुलांना दिली जाऊ नये, असं IAPSM च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुनीला गर्ग यांचं स्पष्ट मत आहे.इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM) संघटनेत भारतातील 550 वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्य आहेत.
देशात फक्त सहव्याधी असलेल्या बालकांनाच लस द्यावी, असं त्यांनाही वाटतं.भारतात करण्यात आलेल्या सीरो सर्वेचा उल्लेख करताना त्या सांगतात, “सुमारे 60 टक्के बालके सीरो सर्व्हेमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ते शाळेत गेले नाहीत ना घरातून बाहेर पडले, पण तरीही त्यांना संसर्ग झाला. पण सोबतच त्यांना कोणत्याच प्रकारची लक्षणे नाहीत. यामध्ये 3 टक्के मुलं 10 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. तर 9 टक्के 11 ते 18 वयोगटातील होती.”पण डॉ. अरोरा यांचं मात्र वेगळं मत आहे. त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे सर्वांनाच लस द्यावी असं त्यांना वाटतं.मॅक्स हॉस्पिटलमध्ये बालरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. श्याम कुकरेजा यांच्या मते, सध्या तरी 12 वर्षांखालील मुलांना लस दिली नाही तरी चालेल. या वयोगटातील मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. पण 12 वर्षांवरील वयाच्या मुलांना लस जरूर द्यायला हवी.वय वाढत जाईल, तशी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, त्यामुळे मोठ्या मुलांना लस द्यायला हवी, असं ते म्हणाले.
पण त्याचवेळी लहान मुलांमध्ये कोरोनाची गंभीर प्रकरणे जास्त आढळून आली नाही, हेसुद्धा त्यांनी मान्य केलं.भारतातील नागरिकांचं लसीकरण टप्प्याटप्प्याने झालं. त्यामध्ये सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, शासकीय कर्मचारी यांच्यासह फ्रंटलाईन वर्करचा समावेश होता. त्यानंतर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सह-व्याधी असणाऱ्या लोकांचं लसीकरण सुरू झालं. त्यानंतर 60 वर्षांवरील, नंतर 45 आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं.इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जून-जुलैमध्ये केलेल्या सर्वेक्षणात भारतात तीनपैकी एका व्यक्तीमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळून आल्याचं म्हटलं. हा सर्व्हे 21 राज्यांतील 36 हजार 227 जणांवर करण्यात आला होता.युकेमध्ये फायजर आणि मॉडर्ना लशींचे काही प्रमाणात दुष्परिणाम दिसून आले.
हृदयात सूज, छातीत दुखणं तसंच हृदयाचे ठोके वाढणं त्यामुळे सुदृढ बालकांना लस न देण्याचाच सल्ला दिला जात आहे.अमेरिकेतील आकडेवारीनुसार तिथं लाखो किशोरवयीन मुलांना लस देण्यात आली. पण दोन्ही डोस घेतलेल्या 12 ते 17 वयाच्या मुलांपैकी प्रति दशलक्ष 60 मुलांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या आढळून आल्या. तर त्याच वयोगटातील मुलींमध्ये प्रति दशलक्ष फक्त 8 मुलींना ही समस्या आढळून आली.युकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते सुदृढ मुलांना कोरोना झाल्यास प्रति दशलक्ष दोन मुले या प्रमाणात त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासते. इतर व्याधी असलेल्या मुलांमध्ये हे प्रमाण प्रति दशलक्ष 100 मुले इतकं होतं.मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. श्याम कुकरेजा सांगतात, कोणत्याही लशीचे दुष्परिणाम तर असतातच.
मॉडर्ना किंवा फायजर लशींनी हृदयाला सूज येत असल्याचं काही प्रकरणात आढळून आलं. पण ही गोष्ट दुर्मिळ आहे.कोरोनामुळे स्थिती बिघडून गंभीर परिणाम समोर येण्यापेक्षा लोकांनी लस घेतलेलीच बरी आहे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ.एन. के. अरोरा यांच्या मते, हृदयात सूजेबाबत बातम्या येत आहेत. पण भारतासाठी ही चिंतेची बाब नाही. भारतात मुलांकरिता कोव्हॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई. लिमिटेडची कार्बेवॅक्स लसही येणार आहे. ही लस हेपेटायटस बीच्या लशीप्रमाणेच असेल, असं त्यांनी म्हटलं