बीड

नगराध्यक्ष डॉ. हजारी यांच्या विरोधात विनयभंग, अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

1 Sept :- किल्लेधारूर शहराचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी मागील 3 दशकापासून अधिक वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोनोग्राफी करण्यास आलेल्या महिलेचा त्यांनी विनयभंग केला, अशी तक्रार सायंकाळी 9 वाजता येथील ठाण्यात पीडितेने दिली.

त्यानंतर विनयभंगासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. हजारी हे नगराध्यक्ष तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य समर्थक आहेत.

पीडितेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, हॉस्पिटलमध्ये आपण सोनोग्राफी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी डॉ. हजारी यांनी आपल्या अंगावरील कपडे काढायला लावत लज्जास्पद वागणूक देत जातीवाचक शब्द वापरल्याची तक्रार नोंद केली. ही तक्रार नोंद झाल्यानंतर हजारी यांच्या हॉस्पिटलसमोर समर्थक आणि शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत घटनेचा निषेध व्यक्त केला.

सदरील विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्यावर दाखल झाल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टर असोसिएशनने काळ्या फिती लावत तहसीलदारांना निवेदन देऊन दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी राखीव पोलीस दलाच्या तुकड्या शहरात दाखल झाल्याने शहरास आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस छावणीचे रूप आले आहे.