राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले
मुंबई: देशातील सर्वाधिक करोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्राने आज मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. आज एकाच दिवशी विक्रमी ८,३८१ रुग्णांनी करोनावर मात केली असून राज्यात आतापर्यंत २६ हजार ९९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४३.३८ टक्के झाले आहे तसेच रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे तर दुसरीकडे मृत्यूदर ३.३७ टक्के इतका खाली आला आहे.
करोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.
राज्यात गेल्या २४ तासांत करोनाने ११६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २ हजार ६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६२ हजार २२८ इतकी झाली असून सध्या प्रत्यक्षात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आतापर्यंत २०९८ जण दगावले
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भाईंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३, सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ५५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २०९८ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद- ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२, सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.