“विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबवू नये”
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार पासून सुरु होत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. यातील दोन दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असणार आहे. जन आशीर्वाद यात्रेमुळे गेल्या तीन दिवसात राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टप्प्याच्या यात्रेदरम्यान नारायण राणे काय बोलतात? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. याआधी भाजपा नेते प्रमोद जठार यांनी विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबू नये असे म्हटले आहे. “यात्रेला स्थगिती देण्यात आली नव्हती ती थोडावेळ थांबवण्यात आली होती आणि शेवटच्या टप्प्यातील यात्रा सुरु होत आहे. जनतेची विचारपूस करण्यासाठी दोन वर्षाच्या कोविडच्या काळात जे काही हाल झाले आहेत त्यातून दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान मोदींच्या आदेशाने आशिर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत,” असे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.
“आम्ही हात जोडून जनतेचा आशीर्वाद घेत आहोत. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. कोकणाचा विकासाचा बॅकलॉग पूर्ण करणं एवढाच आमचा अजेंडा आहे. जमाव आला नाही तर विकास कसा होणार. विकासाच्या वादळाला शिवसेनेने थांबवू नये. शिवसेनाही विकासाला पाठिंबा देईल आणि विरोध होणार नाही असा विश्वास आहे,” असे जठार यांनी म्हटले आहे.