OBC आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. OBC आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
OBC आरक्षणावरील या महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे मात्र अनुपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. कपिल सिब्बल हे राज्य सरकारचे सरकारी वकील आहेत. ते ही बाजू मांडतील. डेटा मिळवायला प्रयत्न सुरू आहेत. काल कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झाली. ही परिस्थिती सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कानावर टाकलं पाहिजे म्हणून आजची बैठक झाली. निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण यावर आधी तोडगा निघाला पाहिजे असं यावर सर्वांचं एकमत झालं. 50 टक्केच्या आतमध्ये आपल्याला राहावं लागेल असं सर्वांचं मत आहे.
एक तृतीयांश जागा कमी होतील मात्र इतर सर्व जागा वाचतील, असं भुजबळ म्हणाले. आजच्या इम्पेरिकल डेटा संदर्भात काय करायचं यावर चर्चा झाली. विधी व न्याय विभागाचं मत घेऊन यावर चर्चा केली जाईल. राज्य सरकारने अद्याप कोणताही प्रस्ताव ठेवला नाही. 50 टक्केच्या वरती जायचं ठरलं तर त्याला कोर्ट आणि इतर गोष्टी आहेत त्यामुळे जास्त वेळ जाऊ शकतो. आम्ही आता आरोप आणि प्रत्यारोप यावर बोलणार नाही तर कसा मार्ग काढायचा हे पाहत आहोत, असं भुजबळ म्हणाले.