भारत

हाय हाय मेहंगाई… खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी वाढ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Aug :- दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडेल आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लॉकडाऊन करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वरून वाढत्या महागाईशी दोन हात करत असताना सामान्य नागरिक पार वैतागून गेला आहे. आधीच इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना आता खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दराने सामान्यांचं कंबरडं मोडलंय. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचं भारतीय उद्योग मंडळाने सांगितलं आहे. एकीकडे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली असताना दुसरीकडे डाळीच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रिटेर बाजारपेठेत डाळीच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून या किंमती आतापर्यंतच्या सर्वात जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.

लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. त्यात मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च पण वाढला हे ही एक कारण आहे.आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नागरिकांना आता महागाईचे हे चटके नकोसे झाले आहेत.

महागाईवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न त्यांना पडला असून लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष घालावे आणि दिलासा द्यावा अशीच मागणी सर्वसामान्य करत आहे. इंधन दरवाढ, आयातीवरील कर आणि कमी उत्पादन या कारणांमुळे किराणा मालाचे भाव वाढल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल या भिती आणि अफवेमुळे तर महागाई भडकली नाही ना ? अशीही शंका आता उपस्थित होत आहे.