शाळा सुरु करण्याची परवानगी न दिल्यास 23 ऑगस्टपासून आम्हीच शाळा सुरु करू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 Aug :- मंदिरांची दारे खुली व्हावी ही भाजपची मागणी आहेच. पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्यामुळे शासनाने नियमावली तयार करुन ज्ञानमंदिर असलेल्या शाळा सुरु कराव्यात. अन्यथा सोमावारपासून (दि.२३) स्वनियमावली तयार करुन औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्लासेस एकाच दिवशी सुरु करण्यात येतील, असा इशारा भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेत राज्य सरकारला दिला आहे.
मागील सुमारे दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ते शिक्षणापासून वंचित होत असल्याचेही बागडे म्हणाले. ऑनलाईन शिक्षणाविषयी बोलताना बागडे यांनी ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य, गोरगरीब खेड्यापाड्यापर्यंत पोहचत नसल्याची खंत व्यक्त केली. कोरोना आणि सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना मोबाईल घ्यायला, इंटरनेट चालवायला पैसा उपलब्ध नाहीत, तर बऱ्याच खेड्यात इंटरनेट पोहचत नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुद्धा पोहचत नसल्याने शेतकरी, शेतमजूर यांची मुले शिक्षणापासून वंचीत राहत आहेत.
शिवाय शिक्षणात खंड पडून ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ नयेत. यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये व खासगी शिकवणी वर्ग १७ आॅगस्टपासून सुरू करण्याचा सरकारचा अध्यादेश कायम ठेवून त्वरीत परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे. २३ ऑगस्टपासून शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, किंवा परवानगी नाकारली असे कळविण्यात यावे, अन्यथा परवानगी दिली असे समजून येत्या सोमवारपासून स्वयनियमावली तयार करून सोशल डिस्टन्सिंग व ५०% क्षमतेसह शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येतील. याबद्दल बागडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
१८ महिन्यांपासून ग्रामीणसह शहरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. या वयात योग्य शिक्षण न मिळाल्यास संपुर्ण पिढी बरबाद होवू शकते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एका बॅंचवर एक विद्यार्थी या प्रमाणे मुलांना शाळेत बोलवावे. गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे तीन विषयांचे तरी वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, असे साकडे बागडे यांनी राज्य सरकारला घातले.