महाराष्ट्र

नियमावलीत बदल! शाळांबाबत महत्वपूर्ण बातमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Aug :- राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. मात्र हा निर्णय आता तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली. ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय.

इतर राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण अथवा औषधेही उपलब्ध नसल्याने लगेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये असं टास्क फोर्सच्या तज्ञांनी सूचित केलं. शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय अंतिमतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची बैठक पार पडेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

पंजाबमधील एका गावात शाळा सुरु केल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली त्यामुळे आम्ही विचारपूर्वक पाऊले टाकत आहोत असं राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत.