महाराष्ट्र

‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते ‘एकनाथ खडसे’ आठवडाभरापासून रुग्णालयात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. ‘एमआयडीसी’तील भूखंड खरेदी प्रकरणामध्ये नेमलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे.

दरम्यान पाच वर्षांपूर्वी भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंवर आरोप झाले होते. यानंतर खडसे यांना 4 जून 2016 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी 23 जून 2016 रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज तीन मे 2017 पर्यंत सुरू होते. त्यानंतर 30 जून रोजी समितीने सरकारला अहवाल सादर केला होता.