“मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री”
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 July :- पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं.
पावसामुळे आणि पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केलं जावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी लगेचच टोला लगावला. “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे.
अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहेत. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.