महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 July :- अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या या परिस्थितीनंतर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. पाऊस सुरु असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी मुसळधार पावसामुळं उद्भवलेली पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसाना पाहून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

अमरावतीतील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पूरस्थितीमुळे जागोजागी चिखल, पाणी होतं. यातून वाट काढत त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. अमरावती जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले. अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले, गावगावांचा संपर्क तुटला, क्षतीग्रस्त पुलांची पाहणी करुन खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.