News

आ.सतीश चव्हाण यांनी दिला दहा लाखाचा निधी.

अंबाजोगाई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दहा लाखाचा आमदार निधी दिली आहे. यासंदर्भातील पत्र आज (दि.29) आ.सतीश चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले.
कोवीड-19 विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने 27 मार्च 2020 रोजी एक वेळची विशेष बाब म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी 50 लाखाचा निधी उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण म्हणाले की, माझा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने मला कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी देण्यात येणार आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री असणे गरजेचे आहे. यासाठी याठिकाणी सहा मल्टी पॅरा मॉनिटर व सहा पल्स ऑक्सिमिटर माझ्या निधीतून देण्यात येणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. सदरील यंत्रसामुग्री याठिकाणी उपलब्ध होणार असल्याने कोरोना बाधित रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार करता येतील. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांना मोठ्या रूग्णालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचा देखील आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, डॉ.नितीन चाटे, डॉ.शैलेंद्र चव्हाण, डॉ.गणेश निकम, रणजित मोरे, आशिष जाधव, गोविंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.